न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ जुलै २०२६) :- मुसळधार पावसानंतर वाकड, ताथवडे, पुनावळे तसेच मुंबई-बंगळुरू महामार्ग परिसरात पाणी साचण्याच्या घटनांवर नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. ही परिस्थिती अनेक ठिकाणी मानवनिर्मित असून नैसर्गिक नाले बुजविणे, अपुरे जलनिस्सारण आणि नियोजनातील त्रुटी यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
बेसमेंटमध्ये पाणी शिरण्यास बांधकामातील दोष कारणीभूत असल्यास संबंधित बिल्डरची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिक पंप उपलब्ध करावेत आणि बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी बंधनकारक करावी, असेही त्यांनी सुचविले.
संवेदनशील भागांची तातडीने तपासणी करून महापालिका, बिल्डर आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे कलाटे यांनी स्पष्ट केले.

















