- क्विक हील फाउंडेशनसोबत सामंजस्य करार, विद्यार्थी करणार सायबर जनजागृती…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ जुलै २०२६) :- सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती आणि विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा बाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीज आणि क्विक हील फाउंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत महाविद्यालयात *’सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब*ची स्थापना करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचे प्रोत्साहन व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांचे सहकार्य लाभले आहे.
डॉ. हर्षिता वाच्छानी यांच्या मार्गदर्शनाखाली या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजामध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध ठिकाणी कार्यशाळा, परिसंवाद, जनजागृती मोहिमा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी सांगितले.
विद्यार्थी ऑफिसर्सची निवड…
या उपक्रमासाठी महाविद्यालयातील उत्साही, जबाबदार व नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर्स म्हणून निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित डिजिटल व्यवहार, ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण, सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता तसेच सायबर सुरक्षेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
क्लब ऑफिसर्सचा पदग्रहण सोहळा नुकताच क्विक हील फाउंडेशनच्या पुणे येथील कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अनुपमा काटकर, फाउंडेशनचे असोसिएट डायरेक्टर अजय शिर्के, सीएसआर एक्झिक्युटिव्ह गायत्री पवार-केसकर तसेच दिपू सिंह यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षेचे महत्त्व, डिजिटल सुरक्षितता, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि जनजागृती उपक्रमाची अंमलबजावणी करण्याविषयी सखोल माहिती, मार्गदर्शन आणि आवश्यक प्रशिक्षण दिले.
नवीन पदाधिकारी..
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लबसाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी स्नेहा तेली यांची अध्यक्षपदी, पियुषा रोहम यांची सचिवपदी, साकीब चौधरी यांची उपक्रम प्रमुख म्हणून तर सिमरन यादव यांची मीडिया प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
डॉ. हर्षिता वाच्छानी या शिक्षक समन्वयक म्हणून कार्य पाहणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संपूर्ण शैक्षणिक वर्षभर विविध सायबर जनजागृती उपक्रम राबविणार आहेत.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भुपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी निवड झालेल्या सर्व क्लब ऑफिसर्सचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

















