न्युज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १७ जुलै २०२६) :- बहाई सेंटर, कोर्ट चेंबर, चर्चगेट येथे आयोजित ‘जस्टिस फॉरवर्ड २०२६’ परिषदेत केंद्रीय कायदा व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी वकिलांनी देशभक्त चित्तरंजन दास यांचा आदर्श अंगीकारून न्यायासाठी लढावे, असे आवाहन केले. दर्द से हमदर्द तक ट्रस्ट, सुप्रा लीगल फाउंडेशन आणि रिनोव्हेट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
मेघवाल म्हणाले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि न्यायापासून वंचित कैद्यांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे. महर्षी अरविंद घोष यांच्या खटल्यात चित्तरंजन दास यांनी निःस्वार्थपणे बाजू मांडून त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.
हा आदर्श भावी वकिलांनी स्वीकारावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, ॲड. प्रकाश साळसिंगीकर, ॲड. सुनीता खंडाळे-साळसिंगीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेत लीगल एड चॅम्पियन्सचा गौरव करण्यात आला तसेच विधी साहाय्य विषयावरील संयुक्त सर्वेक्षणाचे प्रकाशन करण्यात आले.

















