न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ जुलै २०२६) :- हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट आणि इंटेलिजंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूल, इंद्रायणीनगर-भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदूभूषण स्मारक परिसरात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी पिंपळ, वड, कडुलिंब, चिक्कू, पेरू आदी विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या हिंदूभूषण स्मारक परिसर अधिक हरित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. “झाडे लावा, झाडे जगवा – पर्यावरण वाचवा” हा संदेश देत विद्यार्थी, शिक्षक आणि ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाला ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश भुजबळ, सदस्य इंद्रजित भोसले, प्रसाद वायकर, समन्वयक गणेश गुरव, ओमकार तसेच शाळेच्या प्राचार्या शिबी राजू आणि शिक्षक उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या आणि शिक्षकांना पेन भेट देण्यात आले.
यावेळी गणेश भुजबळ यांनी, हिंदूभूषण स्मारक हे सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपणारे प्रेरणास्थान असून प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वाढत्या प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची गरज अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

















