न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ जुलै २०२६) :- सांगवी व दापोडी परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाणीपुरवठा अधिक नियमित, वेळापत्रकानुसार आणि सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेने जलवाहिन्या, उंच जलकुंभ आणि वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला असून, पाण्याच्या टाक्यांवर नियमित कर्मचारी तैनात करणे, वितरणाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यक ठिकाणी मनुष्यबळ वाढविणे, तांत्रिक त्रुटी दूर करणे आणि देखरेख मजबूत करण्याचे काम सुरू आहे.
सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वितरण व्यवस्थेवर सातत्याने नियंत्रण ठेवले जात असून, स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहनही महापालिकेने नागरिकांना केले आहे.
















