न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ जुलै २०२६) :- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेस तसेच निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी त्यांनी अण्णा भाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या लेखणी, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य उभे केले असल्याचे सांगितले. ‘फकीरा’सारख्या साहित्यकृतीतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा विचार मांडत वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला स्वाभिमानाची प्रेरणा दिली, असे त्या म्हणाल्या.
अण्णा भाऊ साठे हे सर्व समाजाचे प्रेरणास्थान असून सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाचा त्यांचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास नगरसेविका अनुराधा गोरखे, उपायुक्त आण्णा बोदडे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















