न्युज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १९ जुलै २०२६) :- वाकड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास तीन साथीदारांसह अटक करत घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून १० लाख ३४ हजार १०० रुपये किमतीचे ९७.८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
उत्कर्ष चौक, वाकड येथील बंद फ्लॅटमधून ७.२० लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपास पथकाने तब्बल १० दिवसांतील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अतुल ऊर्फ आट्या चंद्रकांत आमले (वय ३०) याला वाकड येथील इराणी कॅफेजवळून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचे साथीदार मोहन ऊर्फ आबा मुजमुले, भीमराव गंगावणे आणि रामेश्वर उपल्ले यांनाही अटक करण्यात आली.
तपासादरम्यान वाकड पोलीस ठाण्यातील घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले. मुख्य आरोपी अतुल आमले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर आणि लातूर येथे एकूण ४४ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंबरीश देशमुख, श्रीनिवास दराडे व तपास पथकाने केली. आरोपींकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.

















