न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या तीन स्वतंत्र प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करत लाखो रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. हिंजवडी, भोसरी आणि बावधन पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२(२), ६१(२), ३१८(४) व ३(५) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
हिंजवडी पोलिसांनी सागर सचदेव मेधाम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने बँक खाते उघडून त्याद्वारे ९ लाख २३ हजार ९६५ रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार केल्याचे आणि देशभरातील १० नागरिकांच्या तक्रारींतील रक्कम त्या खात्यात जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
भोसरी पोलीस ठाण्यात शिवकुमार अमोलराव धोटे याच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बँक खाते वापरून देशातील नागरिकांची सुमारे १२ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तर बावधन पोलिसांनी श्रीकांत कैलास राठोड आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कारवाई केली आहे. आरोपींनी बँक खात्याद्वारे संशयास्पद आर्थिक व्यवहार करत सहा नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तीन्ही प्रकरणांमध्ये संबंधित बँक खात्यांतील व्यवहार, साथीदारांची भूमिका आणि फसवणुकीचे जाळे उघड करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

















