- २० ऑगस्टपर्यंत ७५ हजार पदवीधर नोंदणीचे लक्ष्य; ५ हजार रक्तदानाचे उद्दिष्ट…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड भाजपाच्या महाबैठकीत आगामी पदवीधर मतदार नोंदणी मोहीम आणि रक्तदान अभियानाला गती देण्यावर भर देण्यात आला. कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे झालेल्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरात किमान ७५ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधरांची नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह हार्ड कॉपी वेळेत सादर करावी, असे निर्देश देण्यात आले. या कामाचा दररोज आढावा घेण्यासाठी विशेष चार्ट तयार करण्यात येणार असून, २० ऑगस्टपर्यंत मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
रवींद्र चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर राबविण्यात येणाऱ्या रक्तदान अभियानाचाही आढावा घेतला. महाराष्ट्रात एक लाख रक्तदानाचा संकल्प करण्यात आला असून, त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराने ५ हजार रक्तदानाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. वाढदिवसानिमित्त फ्लेक्सबाजीपेक्षा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. बीएलए-२चे काम पूर्ण झाले असले तरी मतदार मॅपिंगची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नगरसेवक आणि संघटना यांनी समन्वयाने काम करून आगामी मोहिमा यशस्वी कराव्यात, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
या महाबैठकीस प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, राजेश पांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार महेश लांडगे, उमाताई खापरे, शंकर जगताप, अमित गोरखे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, पदवीधर नोंदणी प्रमुख राजेश पिल्ले, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, मंडलाध्यक्ष, विविध मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















