न्युज पीसीएमसी नेटवर्क
मुळशी (दि. १९ जुलै २०२६) :- माण (ता. मुळशी) येथील भोईरवाडीत बॉण्ड पेपरच्या वादातून एका डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन प्रकाश बोलके (वय २२) हा सुमा फ्लिपकार्ट स्टोअरच्या मागील परिसरात असताना आरोपी अविष्कार गोंडावे, सुमित सांवत, तनिष्क शिंदे आणि जय पवार यांनी त्याच्याकडे वाहन व्यवहाराशी संबंधित बॉण्ड पेपर मागितला. फिर्यादीने तो देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून चौघांनी त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तनिष्क शिंदे याने लाकडी बॅटने डोक्यात वार करून जखमी केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर आरोपींनी पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

















