न्युज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १९ जुलै २०२६) :- वाकड येथील म्हातोबा नगर झोपडपट्टी परिसरात कौटुंबिक वादातून सासूवर सिमेंटच्या गड्ड्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी सून, तिची आई आणि बहिणीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता जगत्राव लांडगे (वय ५५) आणि त्यांची सून निकिता यांच्यात घरगुती किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर निकिता माहेरी गेली होती. काही वेळाने ती आई सुनीता आणि बहिण सोनू हिच्यासह परत आली. यावेळी पुन्हा वाद झाल्यानंतर तिघींनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीने प्रतिकार केल्याने सोनूने त्यांचे हात धरले, तर सुनीता हिने जवळ पडलेला सिमेंटचा गड्डा डोक्यात मारून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

















