न्युज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. १९ जुलै २०२६) :- रावेत येथील प्राधिकरण उद्यानात फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका शिक्षिकेवर दगडाने हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रावेत पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशमा वासुदेव जाधव (वय ३२, रा. पुनावळे) या त्यांच्या मैत्रीण संगीता यादव यांच्यासह प्राधिकरण उद्यानात फोटो काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी रितेश जाधव याने अचानक दगड उचलून फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या बाजूस मारून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर विशाल घोगरे याने फिर्यादीचा हात पकडून बोटे वाकडी केली तसेच कानशिलात मारहाण केली.
मारहाणीनंतर दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करत घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

















