न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात अवैध मद्यविक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत निगडी, चिखली, भोसरी आणि रावेत परिसरात चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत देशी व विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून चौघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
निगडी पोलिसांनी कस्तुरी मार्केट, चिंचवड येथे प्रवीण पद्माकर भोके (वय ३४) याला सुमारे ४ हजार रुपये किमतीच्या देशी दारूसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे मद्य विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चिखली पोलिसांनी विसावा चौक, कुदळवाडी येथील पत्राशेडमध्ये छापा टाकून रोहित देशी राठोड (वय २१) याच्याकडून ७ हजार ६७० रुपये किमतीच्या देशी व विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. हा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले.
भोसरीतील हॉटेल जगदंबा येथे दारुबंदी पथकाने कारवाई करून आकाश राजेश पुरी (वय ३२) याच्याकडून ७ हजार २०० रुपये किमतीची देशी व विदेशी मद्याची बाटली जप्त केली. तर रावेत परिसरातील पुनावळे येथे अमोल परमेश्वर पवार (वय ३८) हा ४ हजार ४१५ रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांच्या ताब्यात आला.
चारही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींना नोटीस देण्यात आली असून जप्त करण्यात आलेला मद्यसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

















