न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जुलै २०२६) :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा मतदारसंघात आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकाराने चिंचवड येथील नोवेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आणि अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
शिबिराचा शुभारंभ सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. उद्घाटनानंतर रवींद्र चव्हाण यांनी शिबिराची पाहणी करून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे मोठे कार्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांनी राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे,” असे ते म्हणाले.
या प्रसंगी भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार निरंजन डावखरे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, राजेश पिल्ले, सभापती संजय नाना काटे, सभापती कैलास कुटे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेवक शीतल शिंदे, नगरसेवक कुशाग्र कदम, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, नगरसेविका शैलजा मोरे, नगरसेविका मधुरा शिंदे, प्रसाद शेट्टी, अमित बाबर, नेताजी शिंदे यांच्यासह पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात सकाळपासूनच युवक, महिला आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तदानासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला असून रक्तदान शिबिर हे त्याचाच एक भाग आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर मदत मिळावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांनी, विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन आमदार अमित गोरखे आणि नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केले आहे.

















