न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरणासाठी ठेकेदारामार्फत खरेदी करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत ‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने निधी जमा करून शालेय साहित्य खरेदीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रविराज काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महानगरपालिकेने आपल्या शाळांमधील ५९ हजार ७९५ विद्यार्थ्यांच्या खात्यात शालेय साहित्य खरेदीसाठी सुमारे २२.९८ कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा केले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात शाळा सुरू होऊन एक महिना उलटूनही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध झालेले नाही.
६ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार विविध योजनांमधील भ्रष्टाचार आणि ठेकेदारीतील अनियमितता रोखण्यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. असे असताना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन अद्यापही ठेकेदारामार्फत साहित्य खरेदी करण्याच्या प्रक्रियेवर भर देत असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत शालेय साहित्य खरेदीसाठी डीबीटी पद्धतीचा अवलंब करावा तसेच सध्या काढण्यात आलेली साहित्य खरेदीची निविदा तातडीने रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ही मागणी मान्य न झाल्यास येत्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रविराज काळे यांनी दिला आहे. महापालिका प्रशासनाने या मागण्यांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
















