न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांनी संयुक्त विशेष मोहीम राबवत चार दिवसांत ६९ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण १८१ वाहनांची तपासणी करण्यात आली असून सुमारे ₹३ लाख ७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाहतूक शाखेच्या निदर्शनास काही शालेय वाहने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणे, सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे अशा प्रकारच्या तक्रारी आल्याने आरटीओच्या वायुवेग पथकाशी समन्वय साधून ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली.
दि. २९ जून, ३० जून, २ जुलै आणि २० जुलै २०२६ रोजी पिंपरी, वाकड, सांगवी, महाळुंगे, चिखली, तळवडे आणि हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत ही विशेष तपासणी मोहीम पार पडली. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
ही मोहीम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यजित आदमणे तसेच वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राबविली. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा संयुक्त मोहिमा सातत्याने सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.

















