न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ जुलै २०२६) :- प्रभाग क्रमांक १६ मधील विकासनगर, किवळे येथील सर्व्हे क्रमांक ३९, के-टाउन शेजारील आरक्षित मोकळ्या जागेत सुसज्ज सार्वजनिक उद्यान विकसित करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विकासनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास असून, लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरणे, व्यायाम आणि विरंगुळ्यासाठी सार्वजनिक उद्यानाची सुविधा उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून सातत्याने उद्यानाची मागणी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रस्तावित उद्यानात आधुनिक खेळणी, वॉकिंग ट्रॅक, बसण्याची व्यवस्था, वृक्षारोपण, हिरवळ, आकर्षक सुशोभीकरण, एलईडी प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, संरक्षक कुंपण, सीसीटीव्ही आणि नियमित देखभाल यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने या जागेची तातडीने पाहणी करून आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मान्यता देत सार्वजनिक उद्यान विकसित करण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती नगरसेविका ऐश्वर्या तर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

















