न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय शिस्त आणि गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या प्रकाराबाबत १५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे खळबळजनक निवेदन सादर केले आहे. बांधकाम परवानगी, नगररचना आणि स्थापत्य विभागातील शासकीय फायली ठेकेदार, एजंट, आर्किटेक्ट, सल्लागार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून हाताळल्या जात असून त्या महापालिकेबाहेरही नेल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
नियमानुसार फायलींची ने-आण वर्ग-४ कर्मचाऱ्यांकडून होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात बाहेरील व्यक्तींकडून हे काम होत असल्याने गोपनीय माहिती धोक्यात येत असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. एखादी फाईल हरवल्यास जबाबदारी शिपायांवर टाकली जाते, मात्र वरिष्ठ अधिकारीच ठेकेदारांना फायली देत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये एजंटांचा मुक्त वावर असल्याचा दावा करत, शासकीय फायली बाहेरील व्यक्तींकडे देण्यास बंदी घालावी आणि फाईल गहाळ झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या निवेदनामुळे महापालिकेतील प्रशासकीय कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयुक्त या आरोपांची चौकशी करून काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















