FDA कडून आस्थापना कायमस्वरूपी सील…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ जुलै २०२६) :- मोशी येथील आदर्शनगर परिसरात बेकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर कत्तलखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई करत संबंधित आस्थापना कायमस्वरूपी सील केली आहे. ही कारवाई स्थानिक नागरिक, सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या मदतीने करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक ४५४ मधील ‘अक्सा बेकरी’ या आस्थापनेत गेल्या काही वर्षांपासून बेकरी उत्पादनांसोबतच बेकायदेशीरपणे गोवंशाची कत्तल व मांस विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. शनिवारी रात्री पोलिसांनी येथे धाड टाकल्यानंतर रविवारी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत शिवराज लोहार यांच्या नेतृत्वाखाली FDA च्या पथकाने सविस्तर तपासणी केली.
तपासणीत बेकरीमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले. बेकरी उत्पादनांच्या ठिकाणी अस्वच्छता, माश्या व कीटकांचा प्रादुर्भाव, फुटलेल्या डीप फ्रीजरमध्ये दूषित अन्नसाठा, तसेच अन्न हाताळणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी न झाल्याचे निदर्शनास आले. कामगारांकडे आवश्यक सुरक्षात्मक साहित्यही उपलब्ध नव्हते.
याशिवाय घटनास्थळावरून मांस व इतर अन्नपदार्थांचे संशयित नमुने जप्त करून प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. खरेदी-विक्रीची नोंद, पेस्ट कंट्रोलची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा अहवालही उपलब्ध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.
या सर्व बाबींची दखल घेत FDA ने संबंधित आस्थापनेविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम ३४ अंतर्गत व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश देत ठिकाण सील केले आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अन्नसुरक्षेचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, जप्त करण्यात आलेल्या नमुन्यांचे अंतिम प्रयोगशाळा अहवाल येणे अद्याप बाकी असून, त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.
















