- ही श्रद्धांजली की राजकीय उदासीनता?..
- दादा…आज तुमचा जन्मदिन! पण तुमचं शहर तुमच्या पहिल्याच जयंतीला तुम्हाला विसरलं?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २२ जुलै २०२६) :- आज तुमची जयंती म्हणायची की जन्मदिन, हा शब्दांचा प्रश्न नाही; तो मनाला चटका लावणारा क्षण आहे. खरं तर आज तुमचा वाढदिवस. तुम्हाला शुभेच्छा देण्याचा दिवस. पण नियतीने तो दिवस आठवणींचा करून टाकला.
घरातला वडीलधारी माणूस निघून गेल्यावर जशी घरभर पोकळी जाणवते, तशीच पोकळी आज पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात जाणवतेय. कारण तुम्ही फक्त नेता नव्हता; तुम्ही कार्यपद्धती होता. पहाटे सहा वाजता जनतेच्या कामाला सुरुवात करणारा नेता आजही शोधून सापडत नाही. आज पहाटेपासून जनतेच्या प्रश्नांसाठी पूर्वीसारखी धडपड करणारे नेतृत्व क्वचितच दिसते. तो वेग आणि जनतेशी असलेली नाळ आज हरवलेली दिसते.
मोशी दुर्घटनेच्या वेळी तुमची आठवण अनेकांना आली. संकट आलं की सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारा, प्रशासनाला जागं करणारा आणि नागरिकांच्या डोळ्यात विश्वास निर्माण करणारा नेता आज असता तर, अशी भावना अनेकांच्या मनात उमटली. आज शहरातील अनेक विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे काम असो, सुशोभीकरण असो, उपसूचनांबाबत उपस्थित झालेले वाद असोत, सांगवी–बोपोडी शितोळे सेतू असो किंवा विद्युत रोषणाईसारख्या अनेक कामांच्या गुणवत्ता, खर्च आणि पारदर्शकतेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचवेळी दोन दिवसांच्या पावसात शहर जलमय होतं, नागरिक त्रस्त होतात, आणि महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबतही चिंता व्यक्त केली जाते. विकासाच्या दाव्यांपेक्षा उत्तरदायित्वाची मागणी अधिक मोठी होत चालली आहे.
मात्र सर्वात मोठा प्रश्न राजकीय आहे…
ज्या पिंपरी-चिंचवड शहराला दादांनी स्वतःचं मानलं, ज्या शहरासाठी आयुष्य झिजवलं, त्या शहरात आज त्यांच्या जन्मदिनाचा अपेक्षित उत्साहही जाणवत नाही. चौकात उत्साह नाही, कार्यकर्त्यांमध्ये हालचाल नाही, जनसंपर्काचे उपक्रम नाहीत. आठवणी आहेत, पण त्यांना कृतीची जोड दिसत नाही.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षनेता आहे. संघटनात्मक ताकदही आहे. मग दादांच्या जन्मदिनानिमित्त शहरभर जनतेला जोडणारे कार्यक्रम, सेवा उपक्रम किंवा कार्यकर्त्यांना एकत्र आणणारे उपक्रम का दिसत नाहीत? हा प्रश्न केवळ पक्षासाठी नाही; तर त्या राजकीय संस्कृतीसाठी आहे, जी दादांनी उभी केली होती. विरोधी पक्ष हा केवळ सभागृहापुरता मर्यादित नसतो; तो रस्त्यावर दिसला पाहिजे. जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढताना दिसला पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा, संघर्षाची प्रेरणा देणारा आणि जनतेला विश्वास देणारा नेता संघटनेत असला पाहिजे. पण आज अनेक कार्यकर्त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे, ‘मरगळ झटकणार कोण’?
नेतृत्व म्हणजे फक्त पद नव्हे. नेतृत्व म्हणजे जनतेच्या दुःखात उभं राहणं, प्रशासनाला जाब विचारणं, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणं आणि स्वतः उदाहरण बनणं. आज त्या नेतृत्वशैलीची उणीव पिंपरी चिंचवड शहराला प्रकर्षाने जाणवते. दादांची आठवण केवळ फलकांवर, बॅनरवर किंवा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जिवंत ठेवून चालणार नाही. त्यांच्या कार्यपद्धतीचा वारसा जिवंत ठेवावा लागेल. लोकांमध्ये मिसळणं, पहाटेपासून जनतेसाठी उपलब्ध राहणं, प्रशासनावर वचक ठेवणं आणि संघटनेत जीव ओतणं, हीच त्यांची खरी ओळख होती.
आज दादांचा जन्मदिन आहे. पण त्याहून मोठा प्रश्न असा आहे की,” दादांना आपण फक्त आठवतो आहोत की त्यांचं नेतृत्व जगतो आहोत?” कारण दादांचा खरा वारसा पुतळ्यांत नाही, तर कार्यपद्धतीत आहे. आणि आज खऱ्या अर्थाने जन्म घ्यायची गरज आहे ती दादांच्या कार्यपद्धतीची, जनतेशी असलेल्या नात्याची आणि नेतृत्वाच्या संस्कृतीची.

















