- भाविकांनी भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावं..
- भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आणि माजी उपमहापौर, नगरसेविका शैलजाताई मोरे यांच आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
प्राधिकरण (दि. २२ जुलै २०२६) :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणाची अनुभूती देण्यासाठी अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने “बोलावा विठ्ठल” या भक्तिगीतांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ग. दि. माडगूळकर मोठे सभागृह, सेक्टर २६, प्राधिकरण, निगडी येथे होणार आहे.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक व संगीतकार कुमार करंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेल्या अभंग, भक्तिगीते आणि नामस्मरणाचा सुरेल मेळ रंगणार आहे. त्यांच्यासह श्रुती करंदीकर, सौरभ दफ्तरदार, वैदेही करंबेळकर, इंद्रायणी महाजन, अंकिता पांडेराणे, ओंकार पाटणकर आदी कलाकार आपल्या सादरीकरणातून भक्तिरसाची अनुभूती देणार आहेत.
“आषाढी एकादशी हा भक्ती, संस्कार आणि समाजातील एकोप्याचा संदेश देणारा पवित्र उत्सव आहे. संतपरंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा आणि प्रत्येकाच्या मनात विठ्ठलभक्ती जागविण्याच्या उद्देशाने ‘बोलावा विठ्ठल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व विठ्ठलभक्तांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून ‘जय जय राम कृष्ण हरी’ च्या अखंड गजरात सहभागी होत भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आणि माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांनी संयुक्तपणे केले आहे.
















