- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे प्रशासनाला निर्देश…
- आपत्ती व्यवस्थापन संदर्भात अधिका-यांना तातडीच्या सूचना…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरावर लागू करण्यात आलेली १५ टक्के पाणी कपात तातडीने मागे घ्यावी तसेच शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठ्याच्या समस्या त्वरित सोडवून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश स्थायी समिती सभेत सभापती अभिषेक बारणे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची 16 जुलै रोजीची तहकूब सभा आणि आजची (22 जुलै) नियमित साप्ताहिक सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेतील कै. मधुकर पवळे सभागृहात पार पडली. यावेळी नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन यांच्यासह स्थायीचे सर्व सदस्य, महापालिका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर संभापती अभिषेक बारणे यांनी पत्रकार परिषदेत सभेतील मंजूर व तहकूब विषयांसह प्रशासनाला दिलेल्या सूचनांची माहिती सांगितली.
झाडांचे सर्वेक्षण, तातडीची उपाययोजना…
सभापती बारणे म्हणाले, अतिवृष्टीमुळे झाडे उन्मळून पडणे, विद्युत तारांवर फांद्या कोसळणे, वाकलेल्या फांद्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे उद्यान विभागाने तातडीने धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक छाटणी करावी. झाडांभोवतीचे काँक्रीटीकरण हटवून त्यांची स्थिती तपासावी आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात.
महावितरणशी समन्वय हवा…
पावसामुळे विद्युत डीपीमध्ये पाणी साचणे किंवा झाडांच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांवर तातडीने कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागांनी महावितरणशी समन्वय साधावा. फांद्या छाटण्यासाठी आवश्यक परवानग्या तात्काळ देण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
डीएमएस प्रणाली कार्यान्वित…
महापालिकेतील नादुरुस्त डीएमएस (सॉफ्टवेअर) प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगत बारणे यांनी बांधकाम विभागाशी संबंधित नागरिकांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता बांधकाम विभागाचे कामकाज त्वरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही सभापती बारणे यांनी सांगितले.
क्रीडा धोरणाची अंमलबजावणी..
महापालिकेचे क्रीडा धोरण तातडीने लागू करून जिम, क्रीडांगणे, जलतरण तलाव आणि जॉगिंग पार्क येथे नागरिकांना नियमानुसार सराव करता येईल, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
कचरा डेपोमुक्त शहर हे लक्ष्य…
पिंपरी-चिंचवड शहर कचरा डेपोमुक्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सध्या देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचराही प्रक्रिया केला जात असून, भविष्यात गरज भासल्यास कचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाली आहे, असे सभापती बारणे यांनी सांगितले. तसेच, शहरातील कचऱ्यावर क्षेत्रीय कार्यालय स्तरावरच प्रक्रिया करण्याची योजना राबविण्यात येत असून, पुढील तीन महिन्यांत त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोशी दुर्घटनाग्रस्तांना मदत..
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात झाली असून, पत्नीला ५० टक्के, आईला २५ टक्के आणि वडिलांना २५ टक्के आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये संपूर्ण रक्कम वारसांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दुर्घटनेतील जखमींनाही मदत करण्यात येणार असून, त्यांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनासोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले.
















