- खंडणी विरोधी पथकाची कारवाई; तांत्रिक विश्लेषणामुळे आरोपी अटकेत…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ जुलै २०२६) :- निगडी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यातील तब्बल १० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कर्नाटक राज्यातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२६/२०१६ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ३७६ तसेच पोक्सो कायद्यान्वये आरोपी हनुमंत दुर्गाप्पा कुऱ्हाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. दरम्यान, आरोपी कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीस हवालदार रमेश मावसकर यांना मिळाली.
यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कानगुडे यांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याचे नेमके वास्तव्य कुरागुंड, ता. राणेबेन्नूर, जि. हावेरी (कर्नाटक) येथे असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार रमेश मावसकर, भूपेंद्र चौधरी आणि निलेश जाधव यांच्या पथकाने कर्नाटकात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला निगडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

















