- “पापा कहते है, बडा नाम करेगा” हे उपहासात्मक गीत गात सरकारविरोधात विद्यार्थ्यांची घोषणाबाजी..
- नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ आंबेडकर चौकात आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | दि. २३ जुलै २०२६ :- दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांनी गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने केली. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, वाढती बेरोजगारी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी “मोदी सरकार जवाब दो…” अशा घोषणा देत सरकारकडे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटीच्या घटनांना जबाबदार असलेल्यांवर कारवाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर मागितले. यावेळी “पापा कहते हैं बड़ा नाम करेगा… मगर ये तो कोई न जाने है मेरी नौकरी है कहाँ…” या उपहासात्मक गाण्याद्वारेही सरकारच्या रोजगार धोरणांवर टीका करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी दिल्लीतील आंदोलनावर झालेल्या पोलिस लाठीमाराचा निषेध नोंदवत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर का करण्यात आला, असा सवाल उपस्थित केला. तसेच “सावित्रीबाई फुले यांचा इतिहास सर्वांना सांगणार” अशा घोषणांसह शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश अधोरेखित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्याची आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
या आंदोलनात विद्यार्थी संघटनांसह कॉकरोच जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
















