न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- पीएमपीएमएलच्या सेवकांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. पेन्शनसाठी कागदपत्रे सादर करण्याची कर्मचाऱ्यांना दिलेली मुदत एक महिन्याऐवजी सहा महिने करण्यात आली आहे.
१९९९ मधील पीएमटी आणि पीएमटी कामगार संघातील तडजोडीच्या कलम १५नुसार वाहन व्यवहार विभागातील सेवकांना पेन्शन देण्याचे मान्य झाले होते. मात्र, अंमलबजावणी न झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले. औद्योगिक न्यायालयाचा २०१३चा कर्मचाऱ्यांच्या बाजूचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने २६ मार्च २०२६ रोजी कायम ठेवला.
पीएमपीएमएलमधून १९९७पासून ५ हजार ६२८ कर्मचारी निवृत्त झाले आहेत. तसेच २६६ जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, १ हजार ४७ कर्मचाऱ्यांचे निधन झाले असून २७८ जण वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा माजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा लाभ होणार आहे.


















