- चर्चेनंतर सोहळा तूर्तास स्थगित….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेत विवाहासाठी रीतसर सुटीचा अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी (दि. ३०) आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याचे नियोजन होते. मात्र, या निर्णयाची पोलिस दलात मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यानंतर दोघींनी विवाह सोहळा तूर्तास स्थगित केल्याचे समजते.
दोघींची ओळख पोलिस भरतीच्या काळात झाली. प्रशिक्षणानंतर काही काळ त्यांची मुख्यालयात नियुक्ती होती. त्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एकाच पोलिस ठाण्यात काम करताना त्यांच्यातील जवळीक वाढली. पुढे त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. याला त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी विरोध केल्याची माहिती आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही भूमिका मांडण्यात आल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, दोघींनी विवाहासाठी सुटीचा अर्ज आणि निमंत्रणपत्रिका सादर केल्याने या विषयाला अधिकृत स्वरूप आले. त्यापैकी एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू केल्याचीही माहिती आहे.
भारतामध्ये प्रौढ व्यक्तींमधील समलिंगी संबंध गुन्हा नसले तरी समलिंगी विवाहाला सध्या स्वतंत्र कायदेशीर मान्यता नाही. सर्वोच्च न्यायालयाने २०२३ मध्ये विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रस्तावित विवाहाच्या कायदेशीर स्थितीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.


















