न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त, विशेष शाखेच्या स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी (दि. २४) पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले. फलकाचे अनावरण आणि फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा या पदावर धीरज पाटील यांची २७ मे २०२६ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार विशेष शाखेच्या उपआयुक्तांसाठी स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष शाखेकडील कामकाज अधिक सुलभ, समन्वयपूर्ण आणि जलद गतीने होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच विशेष शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांनी कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि समर्पित भावनेने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या कार्यक्रमास अपर पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार, गणेश इंगळे, संदीप आटोळे, प्रदीप जाधव, मारुती जगताप, विक्रांत देशमुख यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तसेच सहायक पोलीस आयुक्त सुनील पंढरकर, रणजीत पाटील, सुदर्शन राठोड, सचिन कदम, सुधाकर यादव, रोहिणी बाणकर, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरवाड यांच्यासह विशेष शाखा-१ आणि विशेष शाखा-२ मधील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
स्वतंत्र कार्यालयामुळे विशेष शाखेच्या प्रशासकीय कामकाजासह विविध संवेदनशील विषयांवरील समन्वय आणि कार्यवाही अधिक प्रभावीपणे करण्यास मदत होणार आहे.

















