न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- परंडवाल चौकातील रखडलेला रस्ता आणि पुलाच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीविरोधात भाजपने पुकारलेले रास्ता रोको आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. पुलाची एक बाजू तातडीने वाहतुकीसाठी खुली करून उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
रस्ता व पुलाच्या कामामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम बनसोडे, मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष योगेश काळोखे यांच्यासह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
परंडवाल चौकातील रस्त्याच्या काही भागाचे तसेच पुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून तांत्रिक मंजुरीनंतर पुढील कामे सुरू होतील. चौकाचे काँक्रीटीकरण, सर्कल आणि सुशोभीकरणाची कामेही प्रस्तावित आहेत. संपूर्ण काम दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी चौकांमध्ये कर्मचारी तैनात करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी रघुवीर शेलार, अनिरुद्ध काळोखे, अभिजित काळोखे, शिवाजी टिळेकर, संभाजी टिळेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला.


















