- पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेषांतराची खेळी फसली…
सूरज करांडे, क्राइम प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ ऑगस्ट २०२६) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर हादरवून सोडणाऱ्या विषारी हातभट्टी दारू मृत्युकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला अखेर उरुळी कांचन पोलिसांनी नाट्यमय पाठलागानंतर ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यानंतर फरार झालेल्या लोंढेने पोलिसांची नजर चुकविण्यासाठी आपला संपूर्ण वेश बदलल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
नेहमी दाढी-मिशा वाढवून आणि कपाळावर टिळा लावून वावरणारा बाळू लोंढे फरारी काळात ओळख पटू नये म्हणून क्लीन शेव्ह झाला होता. त्याने आपला पेहरावही बदलला असून, मळकट कपडे घालून तो सामान्य व्यक्तीसारखा वावरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव फार काळ टिकू शकला नाही.
उरुळी कांचन परिसरात तो लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून अखेर त्याला जेरबंद केले.
विषारी दारूकांड….
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात २६ ते २८ मेदरम्यान विषारी हातभट्टीची दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू आहे. आतापर्यंत १० ते १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या अवैध दारू रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा संशय असून, त्यांचा शोध सुरू आहे. जप्त मोबाईल आणि अन्य तांत्रिक पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणीही सुरू आहे. मुख्य आरोपीच्या अटकेमुळे या मृत्युकांडाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.


















