न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ ऑगस्ट २०२६) :- माहेरच्या मालमत्तेतील हिस्सा आणि मालमत्तेच्या कागदपत्रांवर भावांच्या बाजूने केलेल्या सह्यांवरून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप वाकडमध्ये समोर आला आहे. या छळाला कंटाळून ४२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शिल्पा सचिन गवारे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ संतोष गुलाब कलाटे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती सचिन गवारे, सासरा उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे आणि दीर संदीप गवारे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिल्पा यांचा विवाह २००९ मध्ये झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असला तरी काही काळानंतर पैशांसाठी छळ सुरू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पतीकडून दारूच्या नशेत मारहाण केली जात होती, तर सासूकडून त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत मानसिक त्रास दिला जात होता, असे तक्रारीत नमूद आहे.
वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. तसेच माहेरच्या मालमत्तेसंदर्भातील कोणत्याही कागदपत्रांवर सासरच्यांच्या संमतीशिवाय स्वाक्षरी करू नये, असा दबावही टाकण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, घटनेच्या रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर शिल्पा यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती माहेरच्या नातेवाईकांना देण्यात आली. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र, मृत्यूच्या परिस्थितीबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून, प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.


















