- कार्यवाही न झाल्यास दिला जनआंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ ऑगस्ट २०२६) :- पाणी, वीज, ड्रेनेज, कचरा, वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि वाढती गुन्हेगारी अशा विविध नागरी समस्यांनी प्रभाग क्रमांक ११ आणि १३ मधील नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नांवर तातडीने ठोस आणि कालबद्ध कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
तुलशी लँडमार्क क्लब हाऊस, स्पाइन रोड येथे नागरिक, रहिवासी आणि जनप्रतिनिधींची समन्वय बैठक झाली. पाणीपुरवठा, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तुंबणाऱ्या ड्रेनेज लाईन आणि प्रभाग ११ मधील अनधिकृत कचरा डंपिंगवर बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला.
सेक्टर ११ व १३ मधील अनधिकृत पार्किंग यार्ड, स्पाइन रोडवरील बेकायदेशीर कंटेनर आणि उड्डाणपुलाखालील अनधिकृत हॉकर्स झोन हटविण्याची मागणी करण्यात आली. तसेच ‘कोयता गॅंग’च्या दहशतीला आळा घालण्यासाठी रात्रीचे पोलीस पेट्रोलिंग वाढवावे, हिंदू भूषण स्मारक परिसरातील कथित अनैतिक प्रकारांवर कारवाई करावी आणि वाहतूक नियंत्रणासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती ठेवावी, अशी मागणी झाली.
या बैठकीला नगरसेवक नम्रता लोंढे, डॉ. सुहास कांबळे, तुषार सहाने आणि अश्विनी वाबळे उपस्थित होते. माजी नगरसेवक संजय वाबळे, तसेच योगेश लोंढे आणि शिवराज लांडगे यांनीही नागरिकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, सेक्टर ११ मधील प्रस्तावित १० हेक्टर गार्डनचा विकास आणि नाल्यांचे सुशोभीकरण तातडीने करण्याची मागणीही करण्यात आली. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


















