न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ ऑगस्ट २०२६) :- तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जनजागृतीची मोहीम अधिक व्यापक केली आहे. परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षकांसाठी अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे १७० शिक्षक उपस्थित होते.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड तसेच अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात अमली पदार्थांचे वाढते संकट, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारे व्यसन आणि त्यातून उद्भवणाऱ्या सामाजिक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळा आणि महाविद्यालय स्तरावर संशयास्पद हालचालींकडे लक्ष ठेवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
या वेळी तज्ज्ञ मार्गदर्शक, पोलिस अधिकारी तसेच विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांनी आपली मते मांडली. अमली पदार्थांविरोधातील लढ्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी व्यसनमुक्ती आणि अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याची शपथ घेतली. पोलिसांच्या या उपक्रमातून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांविरोधात प्रभावी जनजागृतीची मोहीम राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


















