न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ ऑगस्ट २०२६) :- थरमॅक्स कंपनीतील कामगारांच्या वेतन करारावर यशस्वी तोडगा निघाला असून, तीन वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल १७ हजार ४०० रुपयांची वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. हा करार १ मे २०२५ ते ३० एप्रिल २०२८ या कालावधीसाठी लागू राहणार आहे. कामगारांच्या एकजुटीमुळे आणि कंपनी व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे हा करार शक्य झाल्याची माहिती संघटनेने दिली.
करारानुसार हजेरी बक्षीस योजनेत ५० टक्के वाढ, फेस्टिव्हल अॅडव्हान्स २० हजारांवरून २४ हजार रुपये, तसेच पीएल रजा साठवणुकीची मर्यादा १६० वरून १७० दिवस करण्यात आली आहे. सेवानिवृत्तीनंतरच्या सात वर्षांच्या मेडिक्लेम संरक्षणात ८० हजारांवरून १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मेडिकल ट्रस्टअंतर्गत कामगारांना ६ लाख ५० हजार, तर कुटुंबीयांना ५ लाख ५० हजार रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत मिळणार आहे.
या करारासाठी संघटनेकडून महेंद्र पासलकर, अनिल हाडवळे, भगवान धनोकर, अजित भालेराव, राजू पवार, रमेश बाचनकर, अतुल काळोखे, सुमित कोंडे, श्रीराम मोरे, मिलिंद बायस्कर आणि युवराज छिद्रे यांनी योगदान दिले.
कंपनीकडून विजय सियाक, आनंद देशमाने, किरण शालिग्राम, अबीद इनामदार, राहुल चौगुले, वैभव यादव आणि स्नेहा घुगे यांनी करार प्रक्रियेत सहभाग घेतला. तसेच एमडी साहेब आणि कविता सिंग यांच्या सहकार्याबद्दल संघटनेने आभार मानले आहेत. कामगारांनी कंपनीच्या प्रगतीसाठी ‘कायझेन’ संकल्पनेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले.


















