- नोटीसीच्या सात दिवसांच्या कालावधीबाबतही प्रश्नचिन्ह?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ ऑगस्ट २०२६) :- महापालिका सर्वसाधारण सभेच्या तारखेवरून सत्ताधारी भाजपमध्येच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. २० ऑगस्ट रोजी तहकूब झालेली सर्वसाधारण सभा १७ सप्टेंबरला घेण्याचे निश्चित असताना सप्टेंबर महिन्याची नियमित मासिक सभा २ सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी होणारी सभा नेमकी अधिकृत की अनधिकृत, यावरून महापालिका राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
स्थायी समितीच्या ठरावानुसार तसेच महापौर रवी लांडगे यांनी दिलेल्या पत्रानुसार २ सप्टेंबरच्या सभेची विषयपत्रिका तयार करण्यात आली आहे. त्यात पार्किंग, मेट्रो, स्वच्छतागृह आणि ई-आरटीएस बस धोरणासारखे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. तहकूब सभेतील ३१ पैकी १८ विषय या सभेत घेण्यात आले आहेत.
सात दिवसांचा कालावधी आवश्यक..
महापालिका अधिनियमानुसार तहकूब सभा वगळता सर्वसाधारण सभेसाठी साधारणतः सात पूर्ण दिवसांची नोटीस देणे अपेक्षित आहे. सप्टेंबर सभेची नोटीस मंगळवारी काढण्यात आल्याने २ सप्टेंबरच्या सभेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, सभांच्या वारंवार बदलणाऱ्या तारखांमुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही स्थानिक नेत्यांना समन्वय राखण्याच्या सूचना केल्याची चर्चा आहे. त्यामुळे २ सप्टेंबरच्या सभेत नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“स्थायी समितीच्या ठरावानुसार आणि महापौर रवी लांडगे यांनी दिलेल्या पत्रानुसार बुधवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी विषयपत्रिका तयार करून ती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तहकूब सभेतील विषय नियमित सभेत घेऊ नयेत, असा कोणताही नियम नाही.”
– मुकेश कोळप, नगरसचिव…


















