- नगरसेविका स्नेहा कलाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन..
- आमदार अमित गोरखे यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ ऑगस्ट २०२६) :- वाकड येथील सौ. शिल्पा सचिन गवारे यांच्या आत्महत्या प्रकरणात कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी शिल्पा गवारे यांचे भाऊ संतोष कलाटे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
दरम्यान, आमदार अमित गोरखे यांनी भाजपच्या नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून दिला. यावेळी शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची माहिती त्यांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरण गांभीर्याने घेत, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासन दिले.
माहेरच्या मालमत्तेतील हिस्सा आणि मालमत्तेच्या कागदपत्रांवरून शिल्पा यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पती सचिन गवारे, सासरा उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे आणि दीर संदीप गवारे यांच्याविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिस तपासासोबतच न्यायालयीन प्रक्रियेलाही गती मिळावी आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी आमदार अमित गोरखे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

















