- परवानगी नसताना ते डक्टमध्ये उतरलेच कसे? त्यांचे तीन साथीदारही बेपत्ता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ ऑगस्ट २०२६) :-निगडी प्राधिकरणातील बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये दोन तरुण कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनेने आता वेगळेच गूढ निर्माण झाले आहे. केवळ अपघात म्हणून या घटनेकडे पाहायचे की यामागे काही वेगळे कारण आहे, असा संशय निर्माण करणारे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहेत. विशेष म्हणजे, याच डक्टमध्ये वर्षभरापूर्वी तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकाच ठिकाणी पाच जणांचा बळी गेल्याने सुरक्षेबरोबरच घटनेच्या परिस्थितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मनोज बाबुराव शिंदे (२६) आणि अमोल अशोक शिंदे (२०) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी होते. धक्कादायक बाब म्हणजे, या डक्टमध्ये काम करण्यासाठी कोणतीही अधिकृत वर्क ऑर्डर काढण्यात आली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे दोघांना डक्टमध्ये उतरण्यास कोणी सांगितले? त्यांना नेमके कोणते काम देण्यात आले होते? हे प्रश्न आता महत्त्वाचे ठरले आहेत.
घटनास्थळी दोन दुचाकी, टिकाव आणि दोन मोबाईल आढळले. त्याहून गंभीर बाब म्हणजे मृतांसोबत असलेले तीन नातेवाईक अथवा मित्र घटनेनंतर बेपत्ता आहेत. त्यांचे मोबाईलही बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या तिघांचा शोध लागल्यानंतर घटनेपूर्वी नेमके काय घडले, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोलिसांकडून सध्या मृत्यूचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्याचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन, वैद्यकीय तसेच फॉरेन्सिक अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही केवळ दुर्घटना की त्यामागे आणखी काही रहस्य दडले आहे, याकडे निगडीकरांचे लक्ष लागले आहे.
“मयत कामगारांसोबत आणखी तिघेजण होते. घटनेनंतर ते तिघे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांचा शोध लागल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात येईल. या कामगारांना डक्टमध्ये नेमके कोणी आणि कशासाठी उतरवले, हे स्पष्ट झाल्यानंतरच घटनेमागील सूत्रधाराचा शोध घेता येईल. कामगार डक्टमध्ये का उतरले होते, हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत कायदेशीररीत्या पुढील कारवाई करणे शक्य नाही.”
प्रशांत ढोले, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग…


















