न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० ऑगस्ट २०२६) :- हिंजवडीतील सहदुय्यम निबंधक कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. कार्यालय परिसरात वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांना वाहने रस्त्यावर किंवा परिसरात मिळेल त्या ठिकाणी उभी करावी लागत आहेत. त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
कार्यालयातील महिला आणि पुरुष स्वच्छतागृहांचीही मोठी दुरवस्था झाली आहे. अस्वच्छता, साचलेले पाणी आणि परिसरात पडलेला कचरा यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्वच्छतागृहांच्या परिसराची अवस्था पाहता स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कार्यालयाच्या आजूबाजूच्या भागातही अस्वच्छता आणि अडगळीचे साहित्य पडलेले आहे.
याबाबत कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, कार्यालय सध्या भाडेतत्त्वावर सुरू आहे. कायमस्वरूपी आणि प्रशस्त जागेसाठी पीएमआरडीएकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. स्वच्छतागृह आणि कार्यालय परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवण्याबाबत संबंधित मालकाला वेळोवेळी सूचना दिल्या जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हिंजवडीसारख्या आयटी हबमध्ये दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना सुसज्ज, प्रशस्त आणि स्वच्छ कार्यालयाची सुविधा कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


















