- आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पत्नी व वडिलांकडे धनादेश सुपूर्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० ऑगस्ट २०२६) :- स्वातंत्र्यदिनानिमित्त करण्यात आलेली विद्युत रोषणाई उतरवताना कासारवाडी येथील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या छतावरून पडून मृत्यू झालेल्या कामगार राहुल साबळे यांच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते शनिवारी पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयात मदतीचा धनादेश राहुल साबळे यांच्या पत्नी संगीता साबळे आणि वडील विठ्ठल महादू साबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
काळेवाडीतील विजयनगर येथील राहुल साबळे (४३) हे कंत्राटदार कंपनीत कार्यरत होते. कासारवाडीतील ‘ह’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या पत्र्याच्या छतावर विद्युत रोषणाई उतरवताना पाय घसरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. साबळे कुटुंबावर कोसळलेल्या संकटात आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ही मदत करण्यात आली.
यावेळी ‘ह’ प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार जगताप यांनी साबळे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.


















