- सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये चुरस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ३१ ऑगस्ट २०२६) :- देहू नगरपंचायतीची विद्यमान पंचवार्षिक मुदत अवघ्या काही महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुक महिला कार्यकर्त्यांमध्येही हालचाली वाढल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे.
देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर २०२१ मध्ये पहिली निवडणूक झाली होती. त्यावेळी १७ पैकी १४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. उर्वरित सदस्यांपैकी भाजपचा एक आणि दोन अपक्ष सदस्यांचा समावेश होता. त्यानंतर राजकीय समीकरणांमध्ये बदल झाले.
आता भाजपने स्वतंत्र कार्यालय सुरू करून निवडणूक तयारीला सुरुवात केली असून स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे, विद्यमान सत्ताधारी विकासकामांच्या आधारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. देहू-आळंदी रस्ता, पालखी मार्ग, वीजपुरवठा, पाणी, सांडपाणी व्यवस्था, रस्ते आणि वाहतूक कोंडी हे आगामी निवडणुकीतील प्रमुख मुद्दे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे देहू नगरपंचायतीची निवडणूक यावेळी अधिक चुरशीची होण्याची चर्चा आहे.


















