- महापालिकेतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर प्रदेश समितीकडून दखल; समन्वयाने काम करण्याच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वारंवार दिसून येणारे मतभेद आणि समन्वयाच्या अभावाची प्रदेश समितीने दखल घेतल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर कोअर कमिटीची सदस्यसंख्या २३ वरून १४ करण्यात आली आहे. काही पदाधिकाऱ्यांना वगळून समिती अधिक मर्यादित करण्यात आली आहे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, शहर संघटनेसाठी नियमित कोअर कमिटी असून महापालिकेसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. प्रदेश समितीच्या सूचनांनुसार महापालिकेचे कामकाज सुरळीत चालावे, शहर विकासासाठी समन्वयाने काम करावे आणि पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
१४ सदस्यांच्या कोअर कमिटीत शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, अमर साबळे, अश्विनी जगताप, भरत पाटील, वैशाली खाडये, मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस आणि सदाशिव खाडे यांचा समावेश आहे.
दरम्यान, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून महापालिकेच्या निर्णयांची अंमलबजावणी करणार असल्याचे प्रशांत शितोळे यांनी स्पष्ट केले.

















