- संभाजीनगरमधील वीजपुरवठा खंडित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ ऑगस्ट २०२६) :- निगडी परिसरातील संभाजीनगर येथील चिंतामणी सोसायटीमध्ये रविवारी (दि. ३०) दुपारी एका विद्युत रोहित्रावर झाड कोसळल्याने आग लागली. घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने झाडाच्या फांद्या हटविण्याचे काम करण्यात आले. दुपारपासून सायंकाळपर्यंत वीज यंत्रणेची दुरुस्ती करून पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, पावसाळ्यात शहरात झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने धोकादायक वृक्षांची वेळेत छाटणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सुट्टीच्या दिवशी दीर्घकाळ वीजपुरवठा बंद राहिल्याने रहिवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. उद्यान विभाग आणि महावितरण यांनी अशा ठिकाणांची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


















