- त्या घटनेला मिळणार नवे वळण?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ ऑगस्ट २०२६) :- निगडी प्राधिकरण परिसरातील बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू असून मृत मजुरांच्या तीन नातेवाईकांना हिंगोली येथून निगडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.
लोकमान्य रुग्णालयाजवळील भूमिगत डक्टमध्ये बुधवारी (दि. २६ ऑगस्ट) रात्री कामासाठी उतरलेल्या मनोज बाबुराव शिंदे (२६) आणि अमोल अशोक शिंदे (२०) या दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. बचाव पथकाने दोघांना बाहेर काढले असले तरी त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
मजुरांना डक्टमध्ये उतरविण्याचा निर्णय कोणी घेतला, सुरक्षा साधनांची उपलब्धता होती का आणि कामाची जबाबदारी कोणाकडे होती, या मुद्द्यांचा तपास केला जात आहे. चौकशी पूर्ण करून दुर्घटनेस जबाबदार व्यक्ती निश्चित झाल्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली.


















