- तळेगाव एमआयडीसीतील शिक्षक कॉलनी परिसरात दहशत...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. ३१ ऑगस्ट २०२६) :- जुन्या वादाच्या रागातून आठ जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून तसेच डोक्यात मोठा दगड घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना तळेगाव एमआयडीसी परिसरातील शिक्षक कॉलनीत घडली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी खुनासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही घटना शनिवारी (दि. ३०) पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास फोटो स्टुडिओ परिसरात घडली. फिर्यादी सुभाष विष्णू शिंगाडे यांचा मुलगा प्रशांत शिंगाडे हा मित्रांसोबत चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करत प्रशांत याच्यावर कोयत्याने डोक्यावर, हातावर, छातीवर व पाठीवर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याचा खून करण्यात आला.
या प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

















