- आयुक्तांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी..
- महापौर, स्थायी सभापती, विरोधी पक्षनेते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संचालक मंडळात समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३१ ऑगस्ट २०२६) :- मोरवाडी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी ‘दिव्यांग भवन फाऊंडेशन’चे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या रचनेला कार्योत्तर मान्यता देण्याचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी महापालिका आयुक्त असणार आहेत. तसेच महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त (समाज विकास विभाग) आणि सहायक आयुक्त (दिव्यांग कक्ष) यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.
मोरवाडी येथे उभारलेल्या दिव्यांग भवनमध्ये २१ प्रकारच्या दिव्यांगांसाठी विविध उपचार, थेरपी, समुपदेशन आणि कौशल्यविकासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिव्यांग नागरिकांना उपचारांसोबतच स्वावलंबनाची दिशा मिळत आहे.
महापालिकेच्या नियंत्रणाखालील या फाऊंडेशनचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालविण्यासाठी संचालक मंडळाची रचना करण्यात आली आहे. या रचनेला आता स्थायी समितीची कार्योत्तर मान्यता मिळणार असून, त्यानंतर दिव्यांग भवनच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक बळ मिळणार आहे.


















