- महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची भावना…
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून घेतली अनोखी प्रेरणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३१ ऑगस्ट २०२६) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १३७व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधत युवा शक्ती, पर्यावरण संवर्धन, क्रीडा, ग्रामीण भारत, भारतीय संस्कृती, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन तसेच विज्ञान-तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी नागरिकांसह ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला.
‘मन की बात’ हा केवळ पंतप्रधानांचा संवाद नसून, देशहिताच्या विचारांना दिशा देणारे आणि सामान्य नागरिकांच्या सकारात्मक कार्याला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारे प्रभावी माध्यम आहे, अशी प्रतिक्रिया अभिषेक बारणे यांनी व्यक्त केली.
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी दिलेला ‘Vocal for Local’चा संदेश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांनी स्थानिक उत्पादने, स्थानिक कारागीर, लघुउद्योजक आणि भारतीय उद्योजकांना प्रोत्साहन देत आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन बारणे यांनी केले. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगाराच्या संधीही वाढतील, असे त्यांनी नमूद केले.
‘मन की बात’मध्ये उल्लेख झालेल्या Mission ShakthiSAT उपक्रमाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. SpaceKidz India या उपक्रमातून १०८ देशांतील सुमारे १२ हजार मुलींना तसेच १०० हून अधिक भारतीय विद्यार्थिनींना अंतराळ विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान आणि STEM क्षेत्रातील प्रशिक्षणाची संधी मिळत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ग्रामीण भागातील प्रतिभेला संधी, पर्यावरण संवर्धन, क्रीडा क्षेत्रातील नव्या प्रतिभांना प्रोत्साहन तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन याबाबतही ‘मन की बात’मधून महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. देशातील सामान्य नागरिकांच्या छोट्या-छोट्या प्रयत्नांतून मोठा सामाजिक बदल घडू शकतो, हा विश्वास या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाल्याचे बारणे यांनी सांगितले.
“‘सबका प्रयास’च्या भावनेतून विकसित, आत्मनिर्भर आणि सक्षम भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने योगदान द्यावे. पंतप्रधानांच्या या संवादातून मिळालेली सकारात्मक ऊर्जा राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात कृतीत उतरवूया,” असे आवाहन अभिषेक बारणे यांनी केले.


















