- २ सप्टेंबरची विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप; प्रलंबित १८ विषय वगळण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३१ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा दावा करत माजी महापौर योगेश बहल यांनी महापौर, महापालिका आयुक्त आणि नगरसचिव यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ॲड. असीम सरोदे अँड असोसिएटेड एलएलपी यांच्या माध्यमातून ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
बहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत अजेंडावरील सर्व विषयांवर चर्चा न होता सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली होती. तहकूब सभा ही मूळ सभेचेच कायदेशीर सातत्य असून, त्यातील प्रलंबित विषय १७ सप्टेंबरच्या सभेतच मांडणे आवश्यक आहे. मात्र, ३१ विषयांपैकी निवडक १८ विषय २ सप्टेंबरच्या विशेष सभेत समाविष्ट करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
एकाच वेळी समान विषय दोन वेगवेगळ्या सभांच्या कक्षेत राहू शकत नाहीत, असा बहल यांचा दावा आहे. त्यामुळे विशेष सभेतील समान विषय तात्काळ वगळून ते केवळ १७ सप्टेंबरच्या तहकूब सभेतच चर्चेला घ्यावेत, अन्यथा सक्षम न्यायालयात दाद मागण्याचा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त आणि नगरसचिवांनी बेकायदेशीर कार्यवाही रोखण्याची जबाबदारी पार पाडावी, अशीही मागणी बहल यांनी केली आहे.

















