- ‘तुमच्या कमिश्नरला बोलवा, मी इथेच आहे,’ असे म्हणत पोलिसांवरच दादागिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- मद्यप्राशन करून भरधाव वाहन चालवत अन्य वाहनाला धडक दिल्यानंतर कार डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ केल्याचा प्रकार औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर रविवारी (दि. ३०) सायंकाळी घडला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाकड पोलिसांनी चालकाविरोधात कारवाई केली.
शशांक प्रशांत खानवलकर (वय ४०, रा. औंध) असे संबंधित चालकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, खानवलकर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असताना त्याच्या कारची दुसऱ्या वाहनाला धडक झाली. त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटून ती डिव्हायडरवर आदळली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चालकाला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांशी वाद घालत शिवीगाळ केली. ‘तुमच्या कमिश्नरला बोलवा, मी इथेच आहे,’ असे म्हणत त्याने अरेरावी केल्याचे व्हिडिओत दिसून आले. पोलिसांच्या अंगावर जाण्याचाही प्रयत्न झाल्याचे नागरिकांनी चित्रीकरण केले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून खानवलकरला कायदेशीर नोटीस बजावली. दरम्यान, काही तासांनी त्याने व्हिडिओद्वारे पोलिसांची माफी मागत आपले वक्तव्य अनावधानाने झाल्याचे सांगितले.

















