- देहूत माजी पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव वार्ताहर (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- देहू नगरपंचायत हद्दीतील शासकीय गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या घरांची अधिकृत नोंद नगरपंचायत अभिलेखात करावी, तसेच नियमानुसार मालमत्ता कर आकारावा, अशी मागणी माजी नगराध्यक्षा पूजा दिवटे आणि माजी उपनगराध्यक्ष मयुर शिवशरण यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.
गायरान भागातील रहिवाशांना नगरपंचायतीकडून रस्ते, पाणी, स्वच्छता, पथदिवे आणि कचरा संकलनासारख्या सुविधा दिल्या जातात. मात्र, घरांची अभिलेखात नोंद नसल्याने रहिवाशांना घरपट्टीचा पुरावा मिळत नाही. परिणामी वीज जोडणी तसेच विविध शासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सन २०११ पूर्वी अस्तित्वात असलेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी करून नोंदणी करावी आणि नियमाप्रमाणे कर आकारणी करावी. तसेच २०११ नंतर उभारण्यात आलेल्या निवासी मालमत्तांचे सर्वेक्षण करून लागू नियमांनुसार कर आकारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मूलभूत सुविधा देताना नागरिकांच्या घरांची अभिलेखीय नोंद होणेही आवश्यक असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा दिवटे आणि शिवशरण यांनी व्यक्त केली.


















