- ६ लाख ८७ हजारांपैकी ४ लाख १७ हजार मतदारांनी भरले गणना पत्रक…
- दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करून मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याची मुदत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ अशी आहे.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघात ६ लाख ८७ हजार ४४८ मतदार होते. ३१ ऑगस्टअखेर ४ लाख १७ हजार ४२५ मतदारांनी गणना पत्रक भरून दिले आहे. तर २ लाख २० हजार ४३९ मतदार आढळून आले नाहीत. १८ हजार १३० मतदारांचे स्थलांतर, १७ हजार १०७ मतदारांचा मृत्यू, १४ हजार १६४ मतदारांची नावे दुबार आणि १८३ मतदार अन्य कारणांमुळे वगळण्यात येत आहेत. त्यामुळे एकूण २ लाख ७० हजार २३ मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
वगळण्यात आलेल्या मतदारांकडे २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे किंवा आई-वडील, आजी-आजोबांचे नाव असल्याचे पुरावे असल्यास नमुना क्रमांक ६ भरून नाव अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. नावातील बदल किंवा दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८, तर एखाद्या नावाबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी नमुना क्रमांक ७ भरता येणार आहे.
दावे व हरकतींवरील निर्णय २९ ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकृत डिजिटल माध्यमांवर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.















