- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी..
- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या सौंदर्यात पडणार आधुनिकतेची भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यटन, पर्यावरण आणि सार्वजनिक सुविधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या थेरगाव येथील ‘बोट क्लब गार्डन’च्या पुनर्विकास कामाला गती देण्यात येत आहे. महापालिका स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी आज या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.
थेरगाव परिसरातील हा प्रकल्प आधुनिक सुविधांनी सुसज्ज करताना नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. पाणी, हिरवाई आणि नागरिकांचे सार्वजनिक जीवन यांचा समन्वय साधत ‘बोट क्लब गार्डन’चा सर्वसमावेशक पद्धतीने विकास करण्यात येणार आहे.
पुनर्विकासानंतर या परिसरात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांसाठी विरंगुळा, खेळ, मनोरंजन आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. पाण्याशी संबंधित आकर्षणे आणि हिरवाईने नटलेला परिसर यामुळे नागरिकांना शहरातच निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालविण्यासाठी एक चांगले ठिकाण उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पामध्ये केवळ सौंदर्यीकरणावर भर न देता पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्यात येणार आहे. नदीतील जलस्रोतांचे संवर्धन, परिसराची स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. नदी परिसरात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरण मिळावे, यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांसाठी दर्जेदार सार्वजनिक ठिकाणांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने ‘बोट क्लब गार्डन’चा पुनर्विकास महत्त्वाचा मानला जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा परिसर नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यातही भर घालेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाहणीदरम्यान अभिषेक बारणे यांनी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती, नियोजन आणि आवश्यक सुविधांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. कामे नियोजनबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या.
















